महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडून निकालही समोर आला. पण, निकाल लागल्यानंतर मात्र अद्यापही राज्यात सत्तास्थापना झालेली नाही. खातेवाटपाटचा तिढा सुटला नसल्यामुळं ही प्रक्रिया लांबणीवर पडत असल्याचं चित्र असतानाच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांची बैठक बोलावली आहे.
सोमवारी दुपारी ही महत्वाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी किंवा त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सदर बैठकीत प्रामुख्याने पाहिली टर्म तरी मुख्यमंत्री पद मिळावं किंवा गृहमंत्री पद शिवसेनेच्या वाट्याला यावं यावर महत्वाची चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या बैठकित मुख्यमंत्री जागा वाटपासोबतच महायुतीतील आपल्या सहभागाबाबत आमदारांना मार्गदर्शन करणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान शिवसेनेच्या वाट्याला 13 मंत्रीपद येण्याची शक्यताही आता वर्तवली जात आहे. मंत्री मंडळात शिवसेनेकडून काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये काही जुन्या मंत्र्यांना मात्र डच्चू मिळणार असल्यामुळं आता संधी मिळणारे आणि संधी गमावणारे चेहरे नेमके कोणते आणि त्यांना पुढं नेमकी कोणती जबाबदारी मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दिल्लीत सुटणार खातेवाटपाचा तिढा
पुढील 24 तासात खातेवाटपाचा तिढा सुटणार असल्याचं म्हटलं जात आहे. दिल्लीत हा तिथा सुटणार असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बैठकीत हा सुटणार असल्याचं म्हटलं जात आहे. या बैठकीच्या धर्तीवर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पुन्हा दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.
राज्यातील मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांच्या शपथविधीची तारीख 5 डिसेंबरला निश्चित झाल्यानंतर विधीमंडळ पक्षाची बैठक ही सोमवार किंवा मंगळवारी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र अद्याप पर्यंत आमदारांना या बैठकीसंदर्भातले कोणताही निरोप नसल्याने बरेचसे आमदार त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात आहेत.