डोंबिवलीत व्हीव्हीपॅटमधील मते पुनर्मोजणीसाठी दीपेश म्हात्रे यांनी भरली चार लाखाची रक्कम

डोंबिवली विधानसभा निवडणुकीतील ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे दहा व्हीव्हीपॅट यंत्रातील मते पुन्हा मोजणीसाठी अर्ज केला आहे. या प्रक्रियेसाठी लागणारी चार लाख ७२ हजार रुपयांची रक्कम उमेदवार म्हात्रे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भरणा केली आहे. त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने डोंबिवलीत ईव्हीएम विरुद्ध आंदोलन सुरू केले असून त्या आंदोलनाचा भाग म्हणून शहरात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे.

शहरातील सामान्य नागरिकांनी ईव्हीएम विरोधात रोष व्यक्त केला आहे. त्यामुळे लोकांच्या मागणीचा विचार करून डोंबिवली शहराच्या विविध भागात ठाकरे गटाकडून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून ईव्हीएम यंत्राऐवजी कागदी मतपत्रिकेच्या माध्यमातून निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली जाणार आहे, असे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.

डोंबिवली विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मतदानाच्या दिवशी बाहेर आलेले आकडे पाहता, त्यात तफावत दिसून आली आहे. त्यामुळे आपण १० व्हीव्हीपॅट यंत्रांमधील मते पुनर्मोजणीची मागणी केली आहे. त्यासाठी लागणारे शुल्क जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भरणा केले आहे, असे म्हात्रे यांनी स्पष्ट केले. या प्रक्रियेमुळे पुढील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून व्हीव्हीपॅट यंत्रातील मते मोजणीसाठी ठिकाण आणि तारीख निश्चित केली जाईल, असे ते म्हणाले. मतदान प्रक्रियेत गडबड होत असल्याचे पुरावे बाहेर आले आहेत. लोकशाही टिकविण्यासाठी आणि जनतेच्या विश्वासाला धक्का लागणार नाही यासाठी आम्ही हा लढा देत आहोत, असे माजी सभापती आणि पराभूत उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी सांगितले. या मतमोजणी प्रक्रियेवरून डोंबिवलीत ठाकरे पक्ष आणि भाजपमधील धुसफूस पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *