येऊरमध्ये पुन्हा धिंगाणा

पर्यावरणीयदृष्ट्या अंत्यत संवेदनशील असलेल्या येऊरच्या जंगल परिसरात मागील काही महिन्यांपासून बंद असलेला धांगडधिंगा पुन्हा एकदा सुरू झाला आहे. विवाह समारंभ आणि पार्ट्यांचे आयोजन येऊरमध्ये होऊ लागले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश असतानाही रात्री-अपरात्री हाॅटेल आणि ढाब्यांवर सुरू असलेल्या पार्ट्यांमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. दोनच दिवसांपूर्वी सुमारे ११ वाजताच्या सुमारास विवाह समारंभासाठी आलेली वाहने रस्त्यालगत उभी राहिलेल्याने येऊरमध्ये कोंडी झाली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या काही ग्रामस्थांनी ही वाहने फोडली.

येऊरचा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असल्यामुळे येथील जंगलाचा भाग पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील आणि शांतता क्षेत्र आहे. येऊरमध्ये बिबट्यांसह इतर वन्यजीव आणि निशाचर प्राणी-पक्षी आहेत. मागील काही वर्षांमध्ये या भागात मोठ्याप्रमाणात ढाबे, बंगले, टर्फ, विवाह समारंभ लाॅन तयार करण्यात आले आहेत. या बांधकामांमुळे मुंबई, ठाणे तसेच विविध भागातून येऊर बाहेरील नागरिक रात्रीच्या वेळेत पार्ट्यांसाठी येतात. रात्रीच्या वेळेत अनेकदा काही आस्थापनांमध्ये मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपक वाजविले जातात. त्यामुळे नागरिक हैराण झाले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी येऊरचे प्रवेशद्वार सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद असेल. अत्यावश्यक सेवेतील वाहने, ग्रामस्थ आणि वनविभाग किंवा वायू दलाच्या वाहनांनाच रात्री परवानगी देण्यात आली होती. शिवाय दोन हाॅटेल मालकांनी उच्च न्याालयातून परवानगी मिळविल्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *