शंकरनगरच्या सरस्वती विद्यालयातील सहलीला निघालेल्या ट्रॅव्हल्स बसचा हिंगणाजवळ अपघात झाला. अपघातानंतर ट्रॅव्हल्स मालकाकडून तातडीने जखमींना मदत अपेक्षित होती. परंतु ट्रॅव्हल्स मालक या प्रकरणात दोषी आढळू नये, यासाठी अपघातानंतर नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयालत अपघातग्रस्त बसच्या परवान्यासाठी धावपळ करत होता. या बसची नियमबाह्य पीयूसीही त्याने काढली.
अपघातग्रस्त बस नागपूर ग्रामीण आरटीओत नोंदणीकृत आहे. तिचा क्रमांक एमएच- ४०, वाय- ७३५० असा आहे. ही बस वैभव वालके यांच्या नावावर आहे. अपघातानंतर संबंधित बस मालकाने विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धावणे अपेक्षित होते. परंतु त्याने कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी धावपळ सुरू केली. अपघातग्रस्त बसचा कर १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंतच भरला होता. त्यामुळे बस मालकाने करापोटीचे १ लाख १ हजार २३६ रुपये तडकाफडकी ऑनलाईन भरले. बसची पीयूसीही नव्हती. पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या पीयूसी केंद्रातून ती वेळेवर काढली गेली. परंतु नागपूर ग्रामीण आरटीओतील अधिकाऱ्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. वाहन उपलब्ध नसतानाही पीयूसी निघाली कशी, हाही प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला.
