रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर अंजनवेल जेटी किनारी रविवारी रात्री १ ते ३ वाजण्याच्या दरम्याने अवैधरित्या एका मच्छिमारी बोटीतून डिझेलची तस्करी करत असताना नऊ जणांना गुहागर पोलिसांनी ताब्यात घेतले.
गुहागर अंजनवेल येथे गस्त घालीत असताना गुहागर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करुन दोन कोटी सहा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
पोलिसांनी या तस्करीसाठी वापरण्यात आलेले साहित्य मच्छिमारी बोट, बोटीवरील मोटर व पाईप, टँकर (एमएच-४६-बीएम-८४५७), बलेनो कार (एमएच-४६-बीके-२५६८), मच्छिमार बोटीतून २५ हजार लिटर डिझेल, आरोपीच्या ताब्यातील नऊ मोबाईल असा मिळून सुमारे दोन कोटी सहा लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एकूण नऊ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुहागर पोलिसांनी प्रथमच अशी गुहागरमध्ये ही सर्वात मोठी डिझेल तस्करी करणाऱ्या टोळी विरोधात कारवाई केली आहे.