गुजरातच्या पाटण जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात १८ वर्षीय विद्यार्थ्याचा रॅगिंगमुळे मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याला कथितरित्या तीन तास उभे राहायला लावले होते. दरम्यान हे प्रकरण उजेडात आल्यानंतर पोलिसांनी वैद्यकीय महाविद्यालयातील रॅगिंगविरोधी समितीकडून यासंबंधीचा अहवाल मागवला आहे. तर महाविद्यालय प्रशासनानेदेखील प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले.
गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील अनिल नटवरभाई मेथनिया हा मृत्यू झालेला विद्यार्थी पाटणच्या धारपूर येथील जीएमईआरएस मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रथम वर्षात शिक्षण घेत होता.
अनिलचा चुलत भाऊ धर्मेंद्र मेथनिया याने सांगितले की, त्याला त्याच्या काकांनी अनिल बेशुद्ध पडल्याचे फोनवरुन सांगितले. तो म्हणाला की, “जेव्हा आम्ही महाविद्यालयात पोहोचलो, तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की तो मृत झाला आहे आणि त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आम्हाला असंही कळलं की तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांची रॅगिंग केली आणि अनिलला दोन-तीन तास उभं राहायला लावलं. आम्ही त्याच्या मृत्यूच्या निष्पक्ष चौकशीची मागणी करतो”.
अनिलबरोबर पहिल्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले की, “शनिवारी रॅगिंग झालेल्या १०हून अधिक विद्यार्थ्यांमध्ये अनिलदेखील होता. आम्ही ज्या प्रदेशातून आलो आहोत त्याच्या आधारावर आम्हाला रात्री ९ च्या सुमारास ठरलेल्या वसतिगृहाच्या ब्लॉकमध्ये एकत्र येण्यास सांगण्यात आले होते. व्हॉट्सअॅप स्टुडंट ग्रुपवर याची माहिती देण्यात आली होती. तीन तासांपेक्षा जास्त वेळ उभे राहिल्यानंतर आम्हाला आमचा परिचय देण्यास सांगण्यात आले”.
कडक कारवाई होणार
दरम्यान महाविद्यालयाचे डीन डॉ. हार्दिक शहा यांनी सांगितले की, “बेशुद्ध पडल्यानंतर काही विद्यार्थी अनिलला धारपूर रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात घेऊन गेले. मात्र नंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. महाविद्यालयाच्या रॅगिंगविरोधी समितीकडून प्रकरणाची चौकशी केली जात आहे. आम्ही पोलिसांनादेखील कळवले आहे. या रॅगिंग प्रकरणात दोषी आढळल्यास आम्ही संबंधितांवर कडक कारवाई करू”.
पोलिस काय म्हणाले?
“आम्ही बालिसाना पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या रॅगिंग विरोधी समितीला ताबडतोब अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्या आधारावर आवश्यक ती कारवाई केली जाईल”, अशी प्रतिक्रिया पाटणचे एसपी डॉ. रविंद्र पटेल यांनी दिली आहे.