भालिवली येथील कुंडात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

वसई पूर्वेच्या भालिवली येथील कुंडात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरूणांचा बुडून मृत्यू झाला. घरात न सांगता हे दोन्ही तरूण या कुंडाच्या परिसरात फिरण्यासाठी गेले होते.

तुषार बेनकुड (२१) हा तरुण नालासोपारा पश्चिमेच्या यशवंत गौरव येथे आपल्या कुटुंबियासमवेत रहात होता. शुक्रवारी संध्याकाळी मुंबईतील कुर्ला येथे राहणारा त्याचा मित्र पवन बोडके (१९) त्याला भेटायला आला होता. दोघेही घरी न सागता दुचाकीने फिरायला गेले होते. बराच वेळ मुलगा घरी न आल्याने तुषारचे वडील चंद्रकात बेनगुडे यांनी शोधाशोध सुरू केली. तुषारचे मोबाईल लोकेशन काढले असता ते वसई पूर्वेच्या भालिवली गावाजवळ आढळले. स्थानिकांच्या मदतीने शोध घेतला असता त्या परिसरातील एका नदीजवळ त्यांची दुचाकी आढळली. पुढे साधारण दीड किलोमीटर चालत गेल्यावर पाण्याचे कुंड दिसले. स्थानिक आदिवसांनी पाण्यात उडी मारून शोध घेतला असता पवनचा मृतदेह आढळला. मात्र तुषार सापडला नव्हता.

शनिवारी तुषारच्या वडिलांनी याबाबत मांडवी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शनिवारी रात्री शोध घेऊन नंतर तुषारचा मृतदेह काढला. कुंडातील पाण्यात दोन्ही तरुण पोहण्यासाठी उतरले होते. मात्र पोहता येत नसल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला. या दोघांची बॅग अथवा कपडे मात्र आढळले नाही, अशी माहिती मांडवी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार वाल्मिक हेंबाडे यांनी दिली.

हे कुंड भालिवली गावापासून आत जंगलात आहे. तेथे पायवाट असून त्यावरून दुचाकी देखील जात नाही. या ठिकाणी कुणी फिरायला जात नाही तसेच येथे कधी कुठलीही दुर्घटना देखील घडली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. तुषार आणि पवन हे दोन्ही तरुण एकाच अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *