माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अकोला येथून सलमानभाई इकबालभाई वोहरा याला अटक करण्यात आली असून तो गुजरातमधील रहिवासी आहे. वोहराने याप्रकरणातील आरोपींना आर्थिक मदत केल्याचा आरोप आहे.
सलमानभाई इकबालभाई वोहरा हा गुजरातमधील पेतलाड येथील रहिवासी आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेने त्याला स्थानिक पोलिसांच्या मदतीने अकोला येथील बालापूर येथून अटक केले. गुजरातमधील आनंद नगर येथील त्याच्या बँक खात्यातून या प्रकरणातील अटक आरोपी गुरनैल सिंहचा भाऊ नरेशकुमार सिंह, अटक आरोपी रुपेश मोहोळ, अटक आरोपी हरिशकुमार यांना पैसे पाठवण्यात आल्याचा आरोप आहे. याशिवाय, त्यांनी इतर व्यक्तींनाही आर्थिक मदत केली आहे. ती रक्कम कटात सहभागी आरोपींनी वापरल्याचा संशय आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे. ही याप्रकरणातील २५ वी अटक आहे.
वांद्रे (पूर्व) येथील खेरनगर परिसरात १२ ऑक्टोबर रोजी रात्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेने एकूण २४ आरोपींना आतापर्यंत अटक केली आहे. यापूर्वी मुळचा पंजाबमधील फाजिल्का, पक्का चिस्ती गावातील रहिवासी असलेल्या आकाशदीपला बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केली होती. अन्य अटक आरोपींच्या चौकशीत आणि गुन्ह्याच्या तपासात आकाशदीपचे नाव उघड झाले. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने पंजाबमध्ये दाखल होऊन पंजाब पोलिसांच्या गुंडविरोधी कृती दलाच्या मदतीने आकाशदीपला अटक केली होती.