विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा आज (सोमवारी, १८ नोव्हेंबर) संध्याकाळी ५ वाजता थंडावणार आहेत. बुधवारी राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार असून शनिवारी मतमोजणी होईल. दरम्यान, विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात नोव्हेंबर महिन्यातील काही दिवस ड्राय डे असतील. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी मुंबईसह, अन्य शहरं व राज्यात दारूविक्री करता येणार नाही. यापूर्वी १२ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीनिमित्त राज्यात ड्राय डे घोषित करण्यात आला होता. तसेच आज सायंकाळी ६ वाजल्यानंतर मुंबईसह सर्व शहरांमध्ये मद्यविक्री करण्यास बंदी असेल. १९ नोव्हेंबर रोजी देखील ड्राय डे असेल. ही बंदी २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत लागू असेल. तसेच मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मद्यविक्रीवर बंदी असेल.