कळवा येथे आठवड्यापूर्वी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाची अखेर ओळख पटली आहे. बालजी यादव (३१) असे मृताचे नाव असून आजारपणामुळे त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. तसेच त्याने महिन्याभरापूर्वी आत्महत्या केली असावी असे पोलिसांचे म्हणणे आहे. बालजी याचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत होता. तसेच त्याचा शिर गळफास घेतलेल्या अवस्थेत होते. तर धड कुजल्यामुळे झाडाच्या बुंध्याजवळ पडलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळले होते.
कळवा येथील पारसिकनगर अग्निशमन दल केंद्राजवळील जाॅगिंग ट्रॅक परिसरात १० नोव्हेंबरला एका व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती कळवा पोलिसांना प्राप्त झाली होती. पोलिसांनी या मृतदेहाची पाहाणी केली असता, मृतदेहाचे शिर गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकत होते. तर त्याचे धड झाड्याच्या बुंध्याला गळून पडले होते. मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसांना कठीण जात होते. दरम्यान, व्यक्तीच्या शर्टच्या काॅलरवर एका शिवणकाम करणाऱ्या व्यक्तीचे नाव छापील होते. तसेच त्याच्या शर्टच्या खिशामध्ये मुंब्रा येथील एका दवाखान्याची चिठ्ठी होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांची काही पथके तयार करण्यात आली.
संबंधित शिवणकाम करणाऱ्या व्यक्तीच्या दोन महिन्यांची पावती पुस्तके पोलिसांनी तपासली. तसेच दवाखान्यात विचारणा केली असता, २० दिवसांपूर्वी बालगोविंद यादव नावाचा व्यक्ती भाऊ हरविला असल्याची चौकशी करण्यासाठी आला असल्याची माहिती तेथील दवाखान्यातील कर्मचाऱ्याने दिली. पोलिसांनी तात्काळ बालगोविंद याला संपर्क साधला. त्याची विचारणा केली. तसेच मृतदेहाचे कपडे आणि बुट दाखविण्यात आले. हे कपडे आणि बुट त्याचा भाऊ बालजी यादव याचे असल्याचे त्याने स्पष्ट केले. तसेच तो हरविल्याप्रकरणी शिळ डायघर पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल होती. मृताच्या कुटुंबियांची पोलिसांनी चौकशी केली असता, तो आजारी असल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. तसेच बालजी याने महिन्याभरापूर्वी आत्महत्या केली असावी असा अंदाज देखील पोलिसांनी व्यक्त केला आहे.