भाजपचे कल्याण जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष संदीप माळी यांच्यावर ठाणे पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून मानपाडा पोलिसांनी बुधवारी रात्री ठाणे जिल्ह्यातून तडीपारची कारवाई केली. निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील भाजपमधील एका महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
संदीप माळी यांचे २७ गावांमधील भोपर परिसरात वर्चस्व आहे. विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत माळी हे कल्याण ग्रामीणमधील मनसेचे उमेदवार राजू पाटील यांचे काम करत असल्याच्या तक्रारी महायुतीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आपल्या वरिष्ठांकडे केल्या होत्या. कल्याण ग्रामीणमध्ये राजेश मोरे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. राजेश मोरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे खास समर्थक मानले जातात. त्यांना निवडून आणण्यासाठी शिवसेना-भाजपने ग्रामीणमध्ये जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
मोरे यांना शिंदे शिवसेनेने कल्याण ग्रामीणमध्ये उमेदवारी दिल्याने मनसेचे उमेदवार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्यावर कठोर शब्दात टीका केली होती. त्यामुळे शिंदे शिवसेना आणि मनसे यांच्यात कल्याण ग्रामीणमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे.
