दादरवरून थेट रत्नागिरी जाणारी पॅसेंजर सेवा बंद; प्रवाशांचे हाल

मुंबई शहर आणि उपनगरातील कोकणवासियांचा मुंबई – रत्नागिरीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी दादर – रत्नागिरी पॅसेंजर सेवा चालवण्यात येत होती. मात्र, करोनाकाळात ही सेवा बंद करून, सप्टेंबर २०२१ पासून दादरऐवजी दिव्यावरून रत्नागिरीपर्यंत पॅसेंजर चालवण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून दादरवरून थेट रत्नागिरीला जाणारी पॅसेंजर सेवा बंद झाल्याने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल सुरूच आहेत.

कोकणवासियांसाठी १९९६-९७ पासून लोकमान्य टिळक टर्मिनसवरून रत्नागिरी पॅसेंजर गाडी सुरू केली. मात्र, मुंबई शहर आणि पश्चिम, पूर्व उपनगरातील कोकणवासियांसाठी लोकमान्य टिळक टर्मिनसऐवजी दादर स्थानक जवळचे असल्याने, ही पॅसेंजर दादरवरून धावू लागली. सर्वच स्थानकांवर थांबणारी ही गाडी लोकप्रिय झाली आणि महत्त्वाची ठरली. कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांतील सर्वच लहान-मोठ्या गावांतून सकाळी लवकर निघून मुंबई शहरात पोहोचून दुपारपर्यंत कामे आवरून त्याच दिवशी गावी परत जाण्यासाठी सर्वांनाच या गाडीचा मोठा आधार होता. परंतु, २०२० च्या शून्य आधारित वेळापत्रकात वक्तशीरपणा सुधारण्यासाठी मध्य रेल्वेने ही गाडी दिव्यापर्यंतच चालवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सप्टेंबर २०२१ मध्ये गाडी क्रमांक ५०१०३ / ५०१०४ रत्नागिरी दादर – रत्नागिरी पॅसेंजर ही रत्नागिरी – दिवा – रत्नागिरी पॅसेंजरमध्ये रूपांतरित करण्यात आली. आता ही गाडी दिवा स्थानकातून सुटत असल्याने दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पश्चिम उपनगरे, वसई, विरार, नालासोपारा, गुजरात येथे स्थायिक असलेल्या कोकणवासीयांना दिवा येथे जाणे-येणे त्रासदायक झाले आहे. तसेच, दिव्याला प्रवास करण्यासाठी रेल्वेशिवाय इतर सोयीस्कर पर्याय नसल्याने लांबून येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *