दादर – माहीम विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या तिरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांना शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे महेश सावंत आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांचे आव्हान आहे. या तिन्ही उमेदवारांनी शिक्षण, आरोग्य, क्रीडा, पाणी व रहदारीशी संबंधित समस्या सोडविणे, जुन्या चाळी व इमारतींचा पुनर्विकास, छत्रपती शिवाजी महाराज पार्क धूळमुक्त आदी मूलभूत व पायाभूत सुविधा देण्याच्या मुद्द्यांवर भर दिला असून भविष्यात यासंबंधित विविध कामे करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यातून दिले आहे.
‘माहिमचं (दादर – प्रभादेवी) हित; आपलाच अमित’ या ब्रीदवाक्याखाली अमित ठाकरे यांनी ‘व्हिजन’ प्रसिद्ध करीत आजवर केलेल्या कामाचा लेखाजोखाही मांडला आहे. युवा पिढीसाठी शैक्षणिक उपक्रम, शाळा व महाविद्यालयांत कायमस्वरूपी समुपदेशकाची नेमणूक, स्थानिक तरुणांना खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळण्यासाठी पाठपुरावा, ज्येष्ठ नागरिक कल्याण योजना, आरोग्य, सांस्कृतिक आदी विविध क्षेत्राशी संबंधित कामे करण्याचे आश्वासन अमित यांनी जाहीरनाम्यातून दिले आहे. तसेच मच्छिमार वसाहत इमारतींचा पुनर्विकास, माहीम पोलीस वसाहतींमधील पोलीस बांधवांना सुरक्षित घरे, पाण्याशी संबंधित समस्या सोडविणे, छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाचा विकास, धुळीपासून मुक्तता, चांगले व उत्तम दर्जाचे रस्ते, अंमली पदार्थमुक्त मतदारसंघ व महिलांना सुरक्षित वातावरण, जुन्या चाळी व इमारतींचा पुनर्विकास, मिठी नदीची साफसफाई व सौंदर्यीकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे अमित ठाकरे यांनी जाहीरनाम्यात नमूद केले आहे.
दरम्यान, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उमेदवार महेश सावंत यांच्या प्रचारपत्रात ठाकरे गटाने मुंबईत केलेल्या विकासकामांचा आवर्जून उल्लेख केला असून त्यात सचित्र माहिती दिली आहे. तसेच निवडून आल्यानंतर मतदारसंघात उत्तम आरोग्य सुविधा, क्रीडा क्षेत्रासंबंधित विविध उपक्रम, रहदारीची समस्या सोडविणे, रखडलेले पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावणे, पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही नमूद केले आहे. जेष्ठ नागरिक, युवक – युवती, महिलांसाठी खुल्या व्यायामशाळा, योगासने शिबिरे, मनःशांती ध्यानधारणा या उपक्रमांना प्रोत्साहन देणार असल्याचे आश्वासनही सावंत यांनी समाजमाध्यमांवरून दिले आहे.
सदा सरवणकरांकडून केलेल्या विकासकामांचा उल्लेख
शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर प्रचारादरम्यान मुख्यतः आमदारकीच्या काळात मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडत आहेत. तसेच विकासकामे ही छायाचित्रांसह समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली जात आहेत. ‘सदा सर्वदा जनतेसाठी. ‘बदलतंय माहीम, प्रभादेवी, दादर; सदा सर्वदा जनतेसाठी हजर’ या घोषवाक्यांचा वापरही करण्यात आला आहे. निवडून आल्यानंतर पुन्हा मूलभूत आणि पायाभूत सुविधांवर भर देणार असल्याचे आश्वासन सरवणकर यांनी दिले आहे.