महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे. पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबरला ४३ जागांसाठी तर उर्वरित ३८ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. ‘इंडिया’ आणि रालोआ (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) अशा दोन्ही आघाड्यांमध्ये अत्यंत चुरशीची लढत होत आहे. भाजपाने केलेल्या जोरदार टीकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर, आरोपांच्या फैरी आदींनी निवडणूक प्रचाराचा पहिला टप्पा गाजला. पहिल्या टप्प्यातील सकाळच्या सत्रात आतापर्यंत १३. ४ टक्के मतदान झालं आहे.
दरम्यान, ‘झारखंडमध्ये आदिवासींची लोकसंख्या झपाट्याने घटत आहे. येथे भाजपाचे सरकार आल्यास घुसखोरांची ओळख पटवून त्यांना हुसकावून लावण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल तसेच त्यांनी बळकावलेल्या जमिनीवर पुन्हा दावा केला जाईल, आदिवासी महिलांशी विवाह करणाऱ्या घुसखोरांना जमिनीचे हस्तांतरण रोखण्यासाठी कायदा आणला जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी केली.
पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
पहिल्या टप्प्यात बुधवारी होणाऱ्या मतदानाबाबतही नियमावली ठरवण्यात आली आहे. रांची विधानसभा मतदारसंघाचे रिटर्निंग अधिकारी उत्कर्ष कुमार यांनी सांगितलं की, सकाळी साडेपाच वाजला मॉक पोल सुरू झाला. तर सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, शौचालय आणि वेब कास्टिंगची सुविधा दिली गेली आहे. याशिवाय सुरक्षेसाठी सीएपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.