राज्यात गुरुवारपासून हलक्या सरी; जाणून घ्या, दिल्लीत दाट धुके का पडले

आंध्र प्रदेश, तमिळनाडूच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र, आणि दक्षिण कोकणात ढगाळ वातावरण निर्माण होऊन गुरुवारपासून पुढे तीन दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश, तमिळनाडू किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. समुद्रावरून आलेले बाष्प दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात येऊन ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. गुरुवारपासून पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे. तसेच ढगाळ हवामानामुळे काही प्रमाणात पडलेली थंडी कमी होणार आहे.

राज्यात मंगळवारी नगर आणि नाशिक जिल्ह्यात सर्वात कमी १३.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात पारा १५ अंशांवर, महाबळेश्वरमध्ये १४ आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये १५.८, मुंबईत २३.६ आणि सांताक्रुजमध्ये २१.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. कमाल तापमान किनारपट्टीवर सरासरी ३५ अंश सेल्सिअस, मध्य महाराष्ट्रात सरासरी ३३ अंश सेल्सिअस, मराठवाड्यात सरासरी ३१ आणि विदर्भात सरासरी ३२ अंश सेल्सिअस राहिले.

पश्चिमी विक्षोपामुळे दिल्ली परिसरात दाट धुके

मध्य आशियातून भारताच्या दिशेने येणारा एक पश्चिमी विक्षोप (थंड हवेचे झोत) सध्या पाकिस्तानला लागून असलेल्या राजस्थान, पंजाब परिसरात सक्रीय आहे. त्यामुळे पंजाब, हरियाणासह दिल्ली परिसरात दाट धुके पडत आहे. पंजाबच्या काही भागात मंगळवारी सकाळी दृष्यमानता शून्य मीटरपर्यंत खाली आली होती. गुरुवारपासून (१४ नोव्हेंबर) आणखी एक पश्चिमी विक्षोप हिमालयात सक्रीय होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उत्तर भारतातील किमान तापमानात घट होऊन थंडीमध्ये काही प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *