घरगुती गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटात १४ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना उंडाळे (ता. कराड) येथे घडली. मुलगा अंकेन श्रीगोविंद सिंग असे जागीच ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. घटनास्थळी पत्रे उडालेली, दुचाकी वाहनांचेही नुकसान झाल्याचे दिसले.
उत्तर प्रदेशमधील तो आईस्क्रीम व्यावसायिक असून, गॅस स्फोटामुळे अंकेन सिंगच्या मृतदेहाच्या अक्षरशः चिंधड्या उढाल्या. स्फोट झालेला गॅस सिलिंडर एका पत्र्याच्या शेडमध्ये ठेवला होता. तर दुर्दैवी मुलगा या शेडबाहेर आंघोळ करत होता. याचवेळी स्फोट होऊन शेडचा पत्रा आणि सिलेंडरचा एक तुकडा संबंधित युवकाच्या डोक्यावर येऊन आदळला आणि यात त्याचा मृत्यू झाला. या वेळी मयताचा सुमारे १० वर्षांचा लहान भाऊ तिथे उपस्थित होता. हे सारे दृश्य पाहून लहान मुलगा अक्षरशः भेदरून गेल्याचे घटनास्थळावरील लोकांनी सांगितले. कराड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, पंचनामा व घटनेच्या चौकशीचे काम सुरु केले आहे. ही घटना नेमकी कशी घडली? याचा शोध सुरु आहे. उत्तर प्रदेशातून ही मुले कामास आणली असून, यात बालगुन्हेगारी आणि अन्न भेसळ विभागाची आईस्क्रीम विक्री परवानगी याचा भंग झाल्याने त्या अंगानेही तपास होण्याची गरज व्यक्त होत आहे.