शिंदे एका तासासाठी 15-16 बॅग कपडे नेतात? राऊतांचा सवाल; म्हणाले, ’25-25 कोटी…’

यवतमाळमधील वणी येथे प्रचारसभेसाठी पोहोचलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी झाल्याच्या मुद्द्यावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. उद्धव ठाकरेंचं हेलिकॉप्टर लॅण्ड झाल्यानंतर ते हेलिकॉप्टरमधून बाहेर पडताच निवडणूक अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्या. यामुळे उद्धव ठाकरे चांगलेच संतापलेले पाहायला मिळालं. त्यांनी व्हिडीओ शूट करत तो शेअर केला. तसंच निवडणूक अधिकाऱ्याला तुम्ही एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याही बॅग तपासा आणि व्हिडीओ शूट करुन मला पाठवा असं सांगितलं. यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आलेले असतानाच ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्याबरोबरच्या बॅगांचा प्रश्न उपस्थित केला आहे.

प्रधानमंत्र्यांच्या ताफ्यातून, अमित शाहांच्या ताफ्यातून बॅगा उतरत नाहीत का?

पत्रकारांनी उद्धव ठाकरेंच्या बँगांची तपासणी झाल्याचा संदर्भ देत राऊत यांना प्रश्न विचारला. “कोण कुठे कसं पैशाचं वाटप करतेय हे आम्ही आतापर्यंत सांगत आलो आहोत. एकनाथ शिंदेंच्या लोकांना 25-25 कोटी रुपये पोहोचले. सांगोल्यात काही नाक्यावर 15 कोटी पकडले. पण फक्त पाच कोटी दाखवले. उरलेले 10 कोटी कुठे आहेत? कोणाचे ते सांगितले का? गाडी कोणाची? कोण होतं गाडीत आम्हाला माहितीये. पैसे कोणाचे होते? कुठे गेले सांगितलं का?” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. तसेच पुढे बोलताना त्यांनी, “उद्धव ठाकरेंची तपासणी करण्याला आक्षेप नाही. सर्वांना समान न्यायानं निवडणूक आयोगाने वागवलं पाहिजे. मुख्यमंत्री, गृहमंत्री असतील सर्वांना समान वागवा. प्रधानमंत्र्यांच्या ताफ्यातून, अमित शाहांच्या ताफ्यातून बॅगा उतरत नाहीत का? त्या कसल्या बॅगा असतात?” असा सवालही राऊत यांनी विचारला.

आमच्या करता तपासण्या यांच्या कधी करणार?

“लोकसभेच्या वेळी मी स्वत: हा व्हिडीओ केलाय. एका तासासाठी मुख्यमंत्री नाशिकमध्ये प्रचारसभेला आले होते. त्याच्या हेलिकॉप्टरमधून 15 ते 16 बॅगा उतरल्या. एका तासासाठी एवढे कपडे घेऊन जातो का माणूस? शिंदे शिर्डीला प्रचाराला गेले होते तेव्हा त्यांच्या विमानातून उतरलेल्या बॅगांचा व्हिडीओ आम्ही प्रसारित केला होता ना? त्या बॅगा कसल्या होत्या? दोन तासासाठी एका हॉटेलात थांबले आणि इतक्या बॅगा? याचा अर्थ काय? आमच्या करता तपासण्या यांच्या कधी करणार?” असा सवाल संजय राऊतांनी विचारला. तसेच पुढे बोलताना, “यंत्रणा विकत घेतली आहे? खोके तुम्हालाही पोहोचले आहेत का?” असं राऊत यांनी विचारलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *