महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. मनसेचा गेल्या निवडणुकीत एकच आमदार निवडून आला होता. परंतु, आता त्यांना सत्तेचे वेध लागले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवार जिंकून येण्याकरता त्यांनी कंबर कसली आहे. दरम्यान, ज्या जागांवर त्यांना विजय निश्चित वाटतोय अशा मतदारसंघात जाऊन ते प्रचार सभा घेत आहेत. आज ते मुंबईतील बोरिवली विधानसभा मतदारसंघात कुणाल माईनकर आणि आजूबाजूच्या मतदरासंघातील उमेदवारांचा प्रचार करण्याकरता आले होते. त्यानंतर ते वर्सोवा आणि प्रभादेवीला जाणार होते. परंतु, त्यांनी आता वर्सोव्याची सभा रद्द केली आहे.
शहर नियोजन, मराठी अस्मिता, राज्यातील राजकीय समिकरणे आदी विविध मुद्द्यांवर राज ठाकरे बोरिवलीतील जनतेशी संवाद साधत होते. त्यांनी आजवर जनतेसाठी केलेल्या कामांची उजळणी केली. दरम्यान, सभा संपत असतानाच त्यांनी त्यांच्या उमेदवारांना बोलावलं. तेवढ्यातच मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नयन कदम यांना एक कॉल आला. राज ठाकरेंनी व्यासपीठावर बोलावताच नयन कदम यांनी तो फोन राज ठाकरेंना दिला. सभा थांबवून राज ठाकरे फोनवर बोलत होते. त्यामुळे नेमकं काय घडतंय याचा पत्ता जनतेला लागत नव्हता. फोन ठेवल्यानतंर राज ठाकरे म्हणाले, “मी तुमच्याशी अजून पंधरा मिनिटे बोलू शकतो. मला आता इथून वर्सोवाला जायचं होतं. तिथं जायला मला एक-सव्वा तास लागला असता. तिथून मला पुन्हा प्रभादेवीला जायला एक-सव्वा तास लागला असता. त्यामुळे शेवटची सभा घेता आली नसती. त्यामुळे वर्सोवातील लोकांनी मला सांगितलं की सभेच्या ठिकाणी स्क्रीन लावली आहेत. त्यामुळे इथून लाईव्ह सभा तिथे दाखवत आहेत. त्यामुळे संदेश देसाई आणि विरेन जाधव या उमेदवारांनी सांगितलं की इथूनच तुम्ही बोला.”
