बोईसर येथे एका चाळीत अज्ञात वस्तूचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या भीषण स्फोटात चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना उपचारासाठी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
एका खोलीत भीषण स्फोट, चार जखमी
पालघर तालुक्यातील बोईसर परिसरातील अवधनगर येथे असलेल्या दुबे चाळीतील एका खोलीत हा भीषण स्फोट झाल्याची घटना घडल्याची माहिती आहे. अचानक स्फोट झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आणि परिसरात सर्वत्र घबराट पसरली. बुधवारी रात्री साडे अकरा-पावणेबारा वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य हाती घेण्यात आले. या स्फोटात दोन मुले, एक पुरुष, एक महिला असे एकूण चार जण जखमी झाल्याची माहिती आहे.
जखमींना उपचारासाठी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र, या स्फोटामुळे चाळीतील खोलींच्या भिंती कोसळल्या आहेत. तसेच, आजूबाजूच्या घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे.
