ओडिशाच्या किनारपट्टी भागावर दाना चक्रीवादळ आदळलं असून इथं आता वादळाचा लँडफॉल सुरु झाला आहे. इथं वादळ ताशी 120 किमी इतक्या वेगानं धडकल्यामुळं सोसाट्याचा वारा, वादळी पाऊस आणि खवळलेला समुद्र असंच भीतीदायक चित्र पाहायसा मिळत आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये या वादळाचे सर्वाधिक परिणाम दिसत असून, तिथं पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळं सखल भागांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करत आपत्ती व्यवस्थापन विभागानं सतर्कतेची पावलं उचलली आहेत.
अनेक रेल्वेसेवा आणि विमानसेवांवरही या चक्रीवादळाचा परिणाम झाला असल्यामुळं प्रवाशांचाही खोळंबा झाला आहे. दरम्यान महाराष्ट्रावर या वादळाचा काहीही परिणाम होणार नाही, असं सांगितलं जात असतानाच कमीजास्त प्रमाणात राज्याच्या हवामानावरही वादळाचे परिणाम दिसून येत आहेत. कुठं राज्यातून वादळी पावसाची एक्झिट पाहायला मिळाली असली तरीही, पुढील 24 तासांमध्ये विदर्भातील काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सध्या पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातून पावसानं काढता पाय घेतल्यामुळं कमाल आणि किमान तापमानात चढ-ऊतार झाल्याचं चित्र आहे. तर, उत्तर महाराष्ट्रात तापमानात घट होण्यास सुरुवात झाल्यामुळं नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईवर चक्रीवादळाचा ‘असा’ही परिणाम…
ओडिशा आणि पश्चिम बंगालवर धडकलेल्या ‘दाना’ या चक्रीवादळाचा परिणाम देशातील काही राज्यांसह मुंबईवरही होणार असल्याचं स्पष्ट होत आहे. चक्रीवादळाचे दूरगामी परिणाम मुंबईत दिसणार असून, यंदाच्या दिवाळीत राज्यासह शहरात थंडीऐवजी पाऊस पडण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.
