मका, कपाशी पीक गेले पाण्यात; बाजारसावंगीत परतीच्या पावसाने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

सोमवारी विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचे चित्र दिसून येत आहे. रविवारी व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे बाजारसावंगी मंडळात टाकळी राजाराय, धामणगाव, रेल, बोडखा, लोणी, इंदापूर, दरेगाव, पाडळी, सोबलगाव, झरी बोडखा या भागातील कापूस, मका, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

शेतात पडून असलेल्या मक्याला अंकुर फुटले आहेत. अनेक ठिकाणी मक्याचे पीक पाण्यात बुडाले आहे. कपाशी झाडावरच ओली होऊन काळवंडली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना या नुकसानीची झळ सोसावी लागत असल्याने शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. परतीच्या पावसामुळे मका व कपाशीच्या बोंडातील सरकीला कोंब फुटू लागले आहेत. मोठ्या कष्टाने फुलवलेल्या शेत शिवारावर अस्मानी संकटच कोसळले आहे. शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसामुळे हिरावला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *