आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्महत्येनंतर गेल्या काही वर्षांमध्ये समाजात त्या विषयी थोडी चर्चा होऊ लागली आहे.कोविड-१९ नंतर वाढलेल्या ताणतणावांच्या पार्श्वभूमीवर वाढत्या आत्महत्या हा एक गंभीर सार्वजनिक प्रश्न म्हणून समोर येऊ लागला आहे. काही घटना इतक्या भयानक घडतात की त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, काय लिहावं किंवा काय सांगावं ते सूचत नाही. अशाच एका व्यक्तीने नोकरी गेल्याच्या तणावात आत्महत्येचा प्रयत्न केला. १२ व्या मजल्यावरुन उडी मारण्यासाठी तो उभा राहिला अन् क्षणात…पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा.
नोएडामध्ये सोमवारी एका व्यक्तीने निवासी इमारतीच्या १२व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इमारतीतील रहिवाशांनी लगेच जाऊन त्या व्यक्तीला आत्महत्या करण्यापासून रोखले. त्याच सोसायटीतील रहिवाशांनी सुटका करण्यापूर्वी त्या व्यक्तीला १२व्या मजल्यावरील बाल्कनीतून लटकलेले पाहिले. यावेळी नोकरी गेल्याने त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. नोकरी गेल्यानंतर झालेल्या त्रासामुळे त्या व्यक्तीने इमारतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र, रहिवाशांनी तत्परतेने कारवाई करत त्याचा जीव वाचवला. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की तो माणूस १२ व्या मजल्यावरील बाल्कनीतून उडी मारण्याच्या मार्गावर आहे, परंतु रहिवाशांनी वेळेवर पोहोचून त्याला मागून पकडले आणि आत्महत्येचा प्रयत्न थांबवला.
