मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी रुग्णालयात असलेली हंगामी पदे रद्द करण्याचा निर्णय घेतला असून त्यात वैद्यकीय महाविद्यालये, उपनगरीय रुग्णालये, दवाखाने, प्रसूतिगृहामधील डॉक्टरांसह निम्नवैद्यकीय कर्मचाऱ्यांचा सेवा कार्यकाळ संपल्यानंतर रद्द करण्यात आल्या. मात्र या सेवा रद्द करताना या कर्मचारी व अधिकाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन प्रलंबित ठेवण्यात आले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर वेतन प्रलंबित ठेवण्यात आल्याने जवळपास १२३० कर्मचाऱ्यांच्या समोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे तडकाफडकी घेतलेल्या या निर्णयामुळे रुग्णसेवा पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई महानगरपालिकेने केईएम, शीव, नायर, कूपर या वैद्यकीय महाविद्यालयांसह उपनगरीय रुग्णालये, प्रसूतिगृह आणि दवाखान्यांमध्ये हंगामी पद्धतीने कार्यरत असलेल्या १२३० डॉक्टरांसह निम्नवैद्यकीय कर्मचाऱ्यांची हंगामी सेवेचा कालावधी संपल्याने त्यांची सेवा नियमित न करता संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. त्यात लहान मुलांचे डॉक्टर, कर्करोग तज्ज्ञ, विविध आजारांवरील डॉक्टरांसह प्रयोगशाळा तज्ज्ञ, तंत्रज्ञ, परिचारिका, औषध िवक्रेते यांच्यासह निम्न वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हंगामी पद्धतीने नियुक्त केलेल्या पदांवर एक ते दोन वर्षांत कायमस्वरूपी नियुक्ती करणे आवश्यक होते. मात्र महानगरपालिका प्रशासनाकडून ही नियुक्ती न झाल्याने आयुक्त भूषण गगरणी यांनी हंगामी पद्धतीने भरलेल्या सर्व नियुक्त्या रद्द करण्यासंदर्भातील परिपत्रक ऑगस्टमध्ये काढले होते. या निर्णयाची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे.
