मेट्रो स्थानकावरून इच्छितस्थळी जाता यावे, यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी)‘मल्टी-मॉडेल इंटिग्रेशन’ सेवेच्या माध्यमातून टी-२ टर्मिनल मेट्रो स्थानक ते विमानतळ (पी४ एंट्री) दरम्यान विशेष मोफत बससेवा सुरू केली. तर दुसरीकडे बेस्ट, वाहतूक पोलीस, विमानतळ प्राधिकरण आणि मुंबई पालिकेच्या मदतीने नवी बस मार्गिका आणि बेस्ट बस थांब्यांची उभारणी, पादचारी पुलाची बांधणी करण्यासह विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे पूर्ण झाल्यास ‘मेट्रो ३’ मार्गिकेवरील प्रवास सुकर होईल, असा दावा ‘एमएमआरसी’ने केला आहे.
‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे-बीकेसी मार्गिकेवरून सध्या दिवसाला २५ हजार प्रवासी ये-जा करीत आहेत. भुयारी मेट्रो प्रवासाचा ‘मेट्रो ३’ मार्गिकेवरील हा आरे-बीकेसी दरम्यानचा पहिला टप्पा सुरू झाला. मात्र, या मार्गिकेवरील प्रवासी संख्या सध्या खूपच कमी आहे. त्यातच मेट्रो स्थानकापासून इच्छितस्थळी जाण्यासाठी आवश्यक त्या कोणत्याही सुविधा मेट्रो स्थानकांबाहेर उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. याच कारणामुळे मोठ्या संख्येने मुंबईकर भुयारी मेट्रोचा प्रवास टाळताना दिसत आहेत. यावरून एमएमआरसीवर टीका होत आहे.
