मोसमी पावसाची देशातून माघार, दक्षिणेत ईशान्य मोसमी पाऊस सक्रिय

महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून मोसमी पाऊस यंदा अपेक्षित वेळेत परतला आहे. मोसमी पावसाने मंगळवारी (१५ ऑक्टोबर) देशातून पूर्णपणे माघार घेतली असून, दक्षिण भारतात ईशान्य मोसमी पाऊस सक्रीय झाला आहे. यंदा दरवर्षीपेक्षा एक दिवस आधी, ३० मे रोजी केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल झाला होता.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा नियोजित वेळेपेक्षा सात दिवस उशिरा २३ सप्टेंबर रोजी मोसमी पावसाचा परतीचा प्रवास दक्षिण राजस्थान आणि गुजरातच्या कच्छमधून सुरू झाला. दोन ऑक्टोबरपर्यंत गुजरात, राजस्थानच्या बहुतांश भागासह लेह, लडाख, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरियाना, दिल्ली, हिमाचल प्रदेशातून मोसमी पाऊस माघारी फिरला होता. पाच ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्याच्या उत्तर भागातून परतीचा प्रवास सुरू झाला होता. ईशान्य भारतासह उत्तराखंड, बिहार, ओदिशा, पश्चिम बंगाल, झारखंडच्या काही भागातून १३ ऑक्टोबरपर्यंत मोसमी पाऊस माघारी परतला तर मंगळवारी (१५ ऑक्टोबर) महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून मोसमी पाऊस परतला आहे. यंदा दरवर्षी सहा दिवस अगोदरच दोन जुलै रोजी मोसमी वाऱ्यांनी सर्व देश व्यापला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *