बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला चकमकीदरम्यान लागलेली गोळी सापडत नसल्याच्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) दाव्याबाबत उच्च न्यायालयाने गुरुवारी नाराजी व्यक्त केली. तसेच, ही गोळी शोधली का नाही ? पोलिसांवर गोळीबार करण्यापूर्वी तहान लागली म्हणून शिंदेला दिलेली पिण्याच्या पाण्याची बाटली जप्त का केली नाही ? पोलीस अधिकाऱ्याला झालेल्या जखमेची न्यायवैद्यक चाचणी केली का ? अशी प्रश्नांची सरबत्ती करून न्यायालयाने सीआयडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केला व महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याबाबत पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या निष्काळजीपणाविषयीही नाराजी व्यक्त केली.
शिंदे याला अन्य प्रकरणाच्या तपासाच्या निमित्ताने घेऊन जात असताना त्याने पाणी मागितले. त्यामुळे, त्याच्या हातातील बेड्या काढून त्याला पिण्याच्या पाण्याची बाटली देण्यात आली. मात्र, या संधीचा फायदा घेऊन शिंदे याने वाहनातील एका पोलीस अधिकाऱ्याचे पिस्तुल हिसकावून घेतले आणि गोळीबार केला, असा पोलिसांचा दावा आहे. असे असताना अशा गंभीर प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे गोळाच केले गेले नसल्यावरून न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने पोलिसांना फटकारले. तसेच, केवळ याच प्रकरणात नाही, तर बहुतांश प्रकरणात पोलीस घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करत नाहीत हे दुर्दैवी असल्याची टिप्पणी केली.
