पुण्यासह राज्यभरात चिकुनगुन्याच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. याचबरोबर रुग्णांमध्ये वेगवेगळी लक्षणे दिसून येत असून, गंभीर गुंतागुंत आढळून येत आहे. यामुळे चिकुनगुन्याच्या विषाणूत झालेला बदल तपासण्यासाठी जनुकीय क्रमनिर्धारण करण्याचा निर्णय राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे.
चिकुनगुन्याच्या काही रुग्णांमध्ये जीवघेणी लक्षणे नोंदविण्यात आली आहेत. त्यात अर्धांगवायू आणि तोंडावर, कानावर काळे चट्टे येणे या प्रकारची लक्षणे दिसून येत असल्याचा दावा काही रुग्णालयांनी केला आहे. याआधी राज्यात २००६, २०१०, २०१६ या वर्षांमध्ये चिकुनगुन्याचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला होता. त्या वेळी काही रुग्णांमध्ये शरीरावर काळे चट्टे आल्याचे दिसून आले होते. दर पाच ते सहा वर्षांनी चिकुनगुन्याची साथ येते. यंदा रुग्णांमध्ये वेगवेगळी लक्षणे दिसून येत असून, तपासणी अहवालही निगेटिव्ह येत आहेत. त्यामुळे जनुकीय क्रमनिर्धारण करून या विषाणूमध्ये झालेला बदल तपासला जाणार आहे.
