मुंबईत एका महिला डॉक्टरला मारहाण करण्यात आल्याची घटना लोकमान्य टिळक रुग्णालयात म्हणजेच सायन रुग्णालय या नावाने परिचित असलेल्या ठिकाणी घडली आहे. मुंबईतलं हे रुग्णालयात मुंबई महापालिकेतर्फे चालवण्यात येतं. मद्यधुंद अवस्थेत राडा करत एका रुग्णाने महिला डॉक्टरला मारहाण केल्याची घटना घडली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली अशी माहिती मार्डच्या डॉक्टरांनी दिल.
नेमकं काय घडलं? पोलिसांनी काय सांगितलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका रुग्णाने मद्यधुंद अवस्थेत राडा घातला आणि एका महिला डॉक्टरला मारहाण ( Mumbai Crime ) केली. एक माणूस जखमी अवस्थेत लोकमान्य टिळक रुग्णालयात आला. त्याला गंभीर इजा झाली होती आणि त्याच्या जखमेला टाके घालावे लागणार होते. इतर डॉक्टरांनी त्याला आधीच टाके घातले होते आणि त्याच्या जखमेत अडकलेला कापूस डॉक्टर काढत होत्या, हे करावं लागतं कारण काय झालं आहे ते पाहण्यासाठी जखम मोकळी करावी लागते. त्यावेळी या रुग्णाला वेदना होऊ लागल्या ज्यानंतर त्याने डॉक्टरला ढकललं. या रुग्णाने मद्यपान केलं होतं अशी माहितीही समोर आली आहे. आम्ही याबाबत अधिक माहिती घेत आहोत असं पोलिसांनी स्पष्ट केलं. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला आहे. राज्य आरोग्य सेवा हिंसाचार प्रतिबंध कायद्याच्या अंतर्गत हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
