मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर कोंबड्यांची वाहतुक करणाऱ्या टेम्पोने एका ट्रकला जोरदार धडक दिली. शनिवारी पाहाटे झालेल्या या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण जखमी आहे. त्याला उपाचारासाठी पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
खालापूर येथील फुडमॉल जवळ मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर ही दुर्घटना घडली. तीव्र उतारावर कोंबडी वाहतुक करणारा टेम्पो साखरेची वाहतुक करणाऱ्या ट्रक वर जाऊन धडकला. या धडकेमुळे दोन्ही वाहनांना आग लागली. ज्यात कोंबडी वाहतुक करणाऱ्या टेम्पो चालकाचा जागीच जळून मृत्यू झाला. तर मोहम्मद सलमान वय २४ हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
टेम्पो चालकाचा डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच आयआरबी, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, खोपोली अग्नीशमन दल आणि अपघातग्रस्तांच्या मदतीला या सामाजिक संस्थेची टीम घटना स्थळी दाखल झाली. त्यांनी जखमी आणि मृत व्यक्तींना बाहेर काढले. अपघात ग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पुर्ववत केली.
