परप्रांतीय हायस्पीड बोटींची होणारी घुसखोरी, पर्ससीन आणि एलईडीमार्फत होणारी बेकायदेशीर होणा-या मासेमारीला कायमस्वरुपी चाप लावण्यासाठी राज्य शासनाने अत्याधुनिक ड्रोन कॅमे-याच्या माध्यमातून गस्त घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तिन्हीही जिल्ह्यांना प्रत्येकी दोन ड्रोन कॅमेरे मंजूर करण्यात आले आहेत. नव्या मत्स्य हंगामात या ड्रोन कॅमे-यांच्या मार्फत राज्यातील सर्वच किनारपट्टीवर नजर ठेवण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून कोकण किनारपट्टी भागांमध्ये परप्रांतीय हायस्पीड बोटींची होणारी घुसखोरी, पर्ससीन आणि एलईडीमार्फत होणारी बेकायदेशीर मासेमारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या विरोधात पारंपारिक मच्छीमार लोकांनी अनेकवेळा आंदोलने, मोर्चे काढून आणि शासनाला निवेदने देऊन यावर कार्यवाही करण्याचे सांगितले होते. मात्र शासनाकडून याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही.
