अनंत चतुर्दशीनिमित्त विसर्जनासाठी मुंबई महापालिकेने ७२ विसर्जन स्थळे आणि २७ कृत्रिम तलावांच्या ठिकाणी विविध सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
मुख्य चौपाटय़ांवर भुसभुशीत वाळूत वाहने अडकू नयेत, यासाठी किना-यांवर २००हून अधिक लोखंडी प्लेट बसवण्यात आल्या आहेत. जर्मन तराफ्यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. जीवरक्षकांसह एकूण ६ जर्मन तराफे, ६ बोटींची व्यवस्था गिरगाव चौपाटीवर करण्यात आली आहे. अशीच व्यवस्था शिवाजी पार्क, दादर, आक्सा, जुहू, मढ-मार्वे, गोराईसह अनेक चौपाटय़ांवर करण्यात आली आहे.
निर्माल्य वाहून नेण्यासाठी विसर्जनस्थळावर कॉम्पॅक्टर, मिनी कॉम्पॅक्टर, डंपरची व्यवस्था करण्यात आली आहे. फ्लड लॅन्टर्न दिवे, सर्च लाईट शिवाय भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी फिरत्या शौचालयांची सुविधा पुरवण्यात आली आहे. प्रमुख चौपाटय़ांवर भरतीच्यावेळी भाविकांना समुद्रात जाण्यापासून रोखण्यासाठी जीवरक्षकांसह खासगी संस्थांच्या मदतीने जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. गिरगाव चौपाटीवर १ हजार ४५७ चतुर्थ श्रेणीतील कामगारांना तैनात करण्यात आले आहे.

