व्हिएनात ऑस्ट्रियन कलाकारांकडून वंदे मातरम गाऊन पंतप्रधान मोदींचं स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौरा आटपून आता ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. आज (१० जुलै) सकाळीच ते ऑस्ट्रियात दाखल झाले. दरम्यान, ऑस्ट्रियात पोहोचल्यानंतर ज्या हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तिथे काही ऑस्ट्रियन कलाकारांनी पाश्चिमात्य वाद्यांच्या सहाय्याने वंदे मातरम् हे गीत गाऊन मोदी यांचं स्वागत केलं. मोदी सध्या व्हिएनामधील हॉटेल रिट्ज-कार्लटनमध्ये थांबले आहेत. गेल्या ४१ वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधान ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. यापूर्वी १९८३ साली भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑस्ट्रियाचा दौरा केला होता. मोदी यांनी व्हिएनात दाखल झाल्यानंतर एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी हा दौरा खूप स्पेशल असल्याचं सांगितलं आहे.

मोदी या दौऱ्यावर ऑस्ट्रियाचे चान्सलर कार्ल नेहमर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. तसेच तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. मोदी यावेळी ऑस्ट्रियन आणि भारतीय व्यावसायिकांना संबोधित करतील. ऑस्ट्रिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी मोदी म्हणाले, लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचं राज्य या सामाजिक मूल्यांच्या पायावर दोन्ही देश आणि आपली भागिदारी निर्माण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *