वरळीतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब आणि बार तसेच उपाहारगृहांवर कठोर कारवाई करावी, तसेच मद्याप्राशन करून वाहने चालविणाऱ्याचा वाहन परवाना रद्द करावा. अशी प्रकरणे रोखण्यासाठी रस्ते, चौक, वर्दळीची प्रमुख ठिकाणे यांसह नाक्या-नाक्यांवर वाहनचालकांची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाईचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आणि महापालिका प्रशासनाला दिले.
वरळी अपघात प्रकरणात शिवसेना उपनेते राजेश शहा यांचा मुलगा असल्याचे समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. तसेच आरोपीवर कारवाईबाबतही संशय व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर मद्यासेवन करून वाहने चालविणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
