रविवारी रात्री झालेल्या पावसाचा रायगडला तडाखा बसला आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अलिबाग आणि मुरूड तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे.
शनिवार पाठोपाठ रविवारीही रायगड जिल्ह्यात पावसाचे रौद्र रूप पहायला मिळाले. शनिवारी कर्जत, खोपोली, पनवेल, सुधागड, रोहा तालुक्यांना पावसाचा तडाखा बसला होता. रविवारी महाड, पोलादपूर, अलिबाग, श्रीवर्धनमध्ये अतिजोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ठिकठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अलिबाग तालुक्यात रविवारी रात्री साडेअकरानंतर विजांच्या कडकडाटासह पावासाला सुरूवात झाली, पहाटे तीन वाजेपर्यंत तुफान पाऊस सुरू होता. त्यामुळे अलिबाग शहरासह, चेंढरे, नेऊली, खंडाळे परिसर जलमय झाले होते. मध्यरात्री अनेक घरांमधे पावसाचे पाणी शिरले होते. त्यामुळे रहिवाश्यांची तारांबळ उडाली होती. घरातील सामानाला सुरक्षित ठेवण्यासाठी धावपळ सुरू होती. अलिबाग तालुक्यात रामराज, चरी, सारळ, किहीम, चौल, पोयनाड परिमंडळात अतिवृष्टी झाली. तळा २८७, म्हसळा २७३, मुरुड २५५, अलिबाग १७०, श्रीवर्धन १३१, माणगाव ९२, रोहा ९३, पनवेल ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात सरासरी १०८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
