कल्याणमधील गुरुकृपा हॉटेलचं अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कालच या हॉटेलवर कारवाई होणार होती. त्यासाठी पालिकेचं अतिक्रमण विरोधी पथकही दाखल झालं होतं. मात्र भाजप समर्थक अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी या कारवाईला विरोध केला.
गायकवाड यांनी थेट राज्य सरकारकडं धाव घेतली आणि या कारवाईला स्थगिती मिळवली होती. त्यामुळं कारवाईसाठी आलेल्या अतिक्रमण विरोधी पथकाला हात हलवत परतावं लागलं.
एका अनधिकृत बांधकामाला चक्क मुख्यमंत्र्यांनीच अभय दिल्याच्या प्रकारानं खळबळ उडाली होती. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर सर्व स्तरातून टीकेची झोड उडाली. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना दुपारपर्यंत अहवाल सादर करण्याते आदेश दिले होते. त्यानंतर अखेर मुख्यमंत्र्यांनी या हॉटेलच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले.

