पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्यात शेफ विकास खन्ना यांना स्वाक्षरी करून तिरंगा भेट दिल्याबद्दल नवा वाद निर्माण झाला आहे. या कृतीबद्दल तीव्र टीका सुरू झाल्यानंतर हा तिरंगा परत घेण्यात आला.
“फॉर्च्युन 500‘ कंपन्यांपैकी 47 कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्षांनी काल रात्री मोदी यांची भेट घेतली. या विशेष कार्यक्रमासाठी शेफ विकास खन्ना यांनी खास पक्वान्न तयार केले होते. भोजनानंतर मोदींनी विकास खन्ना यांची भेट घेऊन त्याचे कौतुक केले व स्वाक्षरी केलेला तिरंगा त्यांना भेट दिला. खन्ना म्हणाले, “”मी 26 भारतीय पदार्थ तयार केले होते. मोदींना हे पदार्थ आवडल्यामुळे ते खूष झाले व त्यांनी स्वाक्षरी केलेला तिरंगा मला दिला.‘‘
घटनेनुसार भारताच्या राष्ट्रध्वजावर काहीही लिहिण्यास मनाई आहे. त्यामुळे मोदींच्या या कृतीवरून वाद सुरू झाला. त्यानंतर हा तिरंगा परत घेण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. विकास खन्ना हा तिरंगा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना भेट देणार होता, असे समजते.

