जलवहन क्षमतेत पुन्हा वाढ? अंधेरी सबवे नाल्याचे नव्याने काम होणार असल्याने खर्चवाढीची शक्यता

पावसाळ्यात अंधेरी सबवेमध्ये पाणी साचू नये म्हणून पालिका प्रशासनाला हाती घेतलेल्या प्रकल्पासाठी पुन्हा एकदा नियोजन करावे लागणार आहे. या प्रकल्पातील नाल्याची रुंदी आणखी वाढवावी लागेल. अंधेरी सब-वेमध्ये मलनिस्सारण वाहिन्यांमधून मोठ्या प्रमाणावर प्रवाह येत आहे. परिणामी, पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्यांवर ताण येत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाचा पुन्हा आढावा घेऊन क्षमता वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्चही वाढण्याची शक्यता आहे.

मुसळधार पाऊस पडला की पाणी साचण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांमध्ये अंधेरी सब-वेचे नाव पहिल्या क्रमांकावर असते. अंधेरी पश्चिम परिसरातील मोगरा नाल्याची रुंदी बऱ्याच ठिकाणी कमी असल्यामुळे पाऊस पडताना व भरतीची वेळ असताना मोगरा नाल्यातील पाण्याची पातळी वाढते व त्यालगत असलेल्या अंधेरी सब – वे, दाऊद बाग, आझाद नगर, वीरा देसाई या परिसरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन जीवित तसेच मालमत्तेची हानी होते. तसेच हा परिसर बशीसारखा असल्यामुळे पाण्याचा निचराही होण्यास वेळ लागतो. अंधेरी पश्चिम भागातील पावसाचे पाणी अंधेरी सब-वे मार्गे मोगरा नाल्यामधून वाहून पुढे मिल्लत नगर, लोखंडवाला कॉम्प्लेक्सजवळ मालाड खाडीमध्ये विसर्जित होते. या परिस्थितीचा अभ्यास करून पालिकेने मोगरा नाल्याचे रुंदीकरण करण्याचे ठरवले आहे. तसेच जिथे रुंदीकरण करणे शक्य नाही अशा ठिकाणी नाला वळवून पाण्याचा निचरा करण्याची सोय करण्यात येणार आहे. पाण्याचा निचरा वेगाने करण्यासाठी सब-वेला समांतर रेल्वे रुळांखालून पर्जन्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे २०९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र या कामांचा खर्च आता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *