बंगळुरुत अॅमेझॉनच्या पार्सल बॉक्समध्ये साप आढळल्याची घटना ताजी असताना आणि हर्षी चॉकलेटमध्ये मृत उंदीर तसंच आईस्क्रीममध्ये बोट आढळल्याचे प्रकार उघड झाले असताना आता अशीच एक बातमी गुजरातमधून समोर आली आहे. अहमदाबाद येथील प्रसिद्ध देवी रेस्तराँमध्ये सांबाराच्या वाटीत उंदीर आढळून आला आहे.
गुजरातमधल्या देवी रेस्तराँमधला प्रकार
अहमदाबाद येथील देवी डोसा रेस्तराँ हे प्रसिद्ध रेस्तराँ आहे. या ठिकाणी अनेक लोक आवडीने पदार्थ खायला येत असतात. याच हॉटेलमध्ये सांबारात मृत उंदीर आढळल्याने खळबळ उडाली आहे. या ठिकाणी ईडली, डोसा, उत्तपा तसंच इतर दाक्षिणात्य पदार्थ खायला मिळतात आणि लोकांची या ठिकाणी गर्दी होते. अहमदाबाद येथील निकोल भागात देवी डोसा सेंटर हे प्रसिद्ध रेस्तराँ आहे. या रेस्तराँमध्ये नाश्ता करण्यासाठी अनेकदा लोक येतात. इथल्या खास चवीमुळे हे रेस्तराँ प्रसिद्ध आहे असंही सांगितलं जातं. याच रेस्तराँमध्ये ही घटना घडली आहे.
