थायलंड येथे पाठविण्यात आलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याची भीती दाखवून बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रक्रार उघडकीस आला आहे. तक्रारीनंतर याप्रकरणी पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
विलेपार्ले येथे पत्नी आणि दोन मुलांसोबत वास्तव्यास असलेले ६४ वर्षांचे वृद्ध तक्रारदार बांधकाम व्यावसायिक आहेत. अर्धांग वायूचा झटका आल्यानतंर त्यांनी सेवा निवृत्ती घेतली होती. त्यांना ४ एप्रिल रोजी एका अज्ञात व्यक्तीने दूरध्वनी करून कुरियर सर्व्हिस कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या नावाने मुंबईहून थायलंड येथे पार्सल पाठविण्यात आले होते. त्यात काही कपडे, पारपत्र, लॅपटॉप, क्रेडिट कार्ड आणि ४० ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) हे अमली पदार्थ सापडले आहे. त्या कुरियरवर आपल्या नावाची नोंद असून १५ हजार ६२५ रुपये भरण्यात आल्याचे त्याने सांगितले. यावेळी त्यांनी आपण कोणतीही वस्तू थायलंडला पाठवलेली नाही, असे तक्रारदाराने सांगितले. मात्र दूरध्वनीवर बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांचे काहीही ऐकून घेतले नाही. संबंधित प्रकरण सायबर पोलिसाकडे गेले आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी बोला असे सांगून त्यांनी एका व्यक्तीला दूरध्वनी दिला. त्या व्यक्तीने आपण गुन्हे शाखेतून रजत पटेल बोलत असल्याचे सांगून त्यांची चौकशी सुरू केली. त्यांच्या वैयक्तिक कागदपत्रांचा कोणी तरी गैरवापर केला आहे. त्यामुळे या सर्व बाबी तपासण्याचे काम सुरू आहे. गेल्या काही दिवसांत अशा प्रकारे फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत, असेही त्याने तक्रारदारांना सांगितले. त्यानंतर त्याने त्यांना स्काईपवर बोलण्यास प्रवृत्त केले. या ॲपवर दूरध्वनी केल्यानंतर त्यांना मुंबई सायबर क्राईम असे नाव आणि लोगो असल्याचे दिसले. त्यामुळे तक्रारदारांचा त्याच्यावर विश्वास बसला. एकमेकांशी चॅट आणि मोबाइलवर संभाषण करताना त्याने आर्थिक गैरव्यवहारात सहभाग असल्याचे निदर्शनास आले असून त्यांच्यावर कारवाई होण्याची धमकी दिली होती.
