मान्सूननं राज्याच वेळेआधीच प्रवेश केला आणि पाहता पाहता तो अतिशय वेगानं कक्षा रुंदावताना दिसला. पण, हाच मान्सून काही दिवसांनंतर मात्र उत्साह मावळावा त्याप्रमाणं मंदावला आणि त्याची आगेकूच थांबली. इथं मान्सूनचा वेग मंदावल्यामुळं चिंता वाढलेली असतानाच आआता पुन्हा एकदा या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी जोर धरल्याचं चित्र सध्या राज्यात पाहायला मिळत आहे.
राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपातील सरी कोसळत असून, पुढील 24 तासांत राज्याच्या कोकण किनारपट्टी भागासह सातारा, पुणे, कोल्हापूरातील घाटमाथ्यावरील परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, विदर्भात पावसाचा यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. विदर्भात विजांच्या कडकडाटासह साधारण ताशी 40 ते 50 किमी वेगानं वारे वाहणार असून, मध्यम स्वरुपातील पर्जन्यमानाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
