नाट्यगृहामागचे अर्थकारण समजल्याशिवाय ती सुधारण्याची जबाबदारी डोक्यावर घेऊ नये, असा अनुभवी सल्ला ज्येष्ठ नेते आणि नाट्यपरिषदेचे विश्वस्त शरद पवार यांनी परिषदेचे अध्यक्ष आणि अन्य नाट्यकर्मी यांना दिला. त्याऐवजी नाट्यगृहांवर कमीत कमी कर, देखभाल खर्च आणि वीज खर्च यांची जबाबदारी राज्य सरकारने घेतली तर हा व्यवसाय तग धरेल. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ खास पुरस्कार सोहळा शुक्रवारी यशवंतराव नाट्यसंकुल माटुंगा येथे झाला. यावेळी पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार उपस्थित होते. पवार यांच्या हस्ते रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्याचे औचित्य साधून नूतनीकरणानंतर पुन्हा कार्यरत झालेल्या यशवंत नाट्य मंदिराचे रसिकार्पण करण्यात आले. नाटयसंमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, उद्याोगमंत्री तथा अ.भा. मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त उदय सामंत, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अ.भा.मराठी नाटय परिषदेचे तहहयात विश्वस्त शशी प्रभू, मोहन जोशी, अशोक हांडे, परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्यासह अनेक मान्यवर कलाकार आणि नाट्यकर्मीही यावेळी उपस्थित होते.
