चेंबूरच्या आचार्य महाविद्यालयातील हिजाब बंदीविरोधात विद्यार्थिनींची उच्च न्यायालयात धाव

मुबईतल्या चेंबूर येथील ना. ग. आचार्य आणि दा. कृ. मराठे महाविद्यालयात हिजाब परिधान करण्यास बंदी खालण्यात आली आहे. या महाविद्यालयात शिकणाऱ्या नऊ विद्यार्थिनींनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने महाविद्यालयातील हिजाबवरील बंदी हटवावी अशी मागणी या विद्यार्थिनींनी केली आहे. यासह त्यांनी महाविद्यालयावर धर्माच्या आधारावर भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. या महाविद्यालयातील हिजाबवरील बंदीचा मुद्दा यापूर्वी देखील चर्चेत आला होता. आता याप्रकरणी विद्यार्थिनींनी थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या विद्यार्थिनींनी म्हटलं आहे की ड्रेस कोडच्या (विशिष्ट पद्धतीचा गणवेश) नावाखाली महाविद्यालयाने थेट हिजाबवर बंदी घातली आहे.

आचार्य महाविद्यालयाने गेल्या वर्षी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एक अधिसूचना काढली होती. या अधिसूचनेद्वारे महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या ड्रेस कोडबाबत काही नियम जारी केले होते. त्यानुसार विद्यार्थिनी हिजाब परिधान करून महाविद्यालयात प्रवेश करू शकणार नव्हत्या. त्यामुळे या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी या ड्रेस कोडला विरोध दर्शवला होता, तसेच त्यांनी महाविद्यालयाविरोधात आंदोलनही केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *