रानटी प्राण्यांच्या शिकारीसाठी वापरण्यात येणारा लसुणगड्डा (फटाका) तोंडात फुटल्याने बालिका जागीच ठार झाली. उमाश्री राजा शिंदे (वय ८) असे तिचे नाव आहे. ही घटना आज सकाळी साडेदहाच्या सुमारास बोलवाड (ता. मिरज) येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, शिंदे कुटुंब पारधी समाजातील आहे. मूळ वरकुडी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील रहिवासी आहे. उमाश्रीचा पिता राजा याला एका गुन्ह्याखाली शिक्षा झाली आहे. सध्या तो सांगली कारागृहात आहे. कारागृहात त्याला भेटण्यासाठी इंदापुरातून वारंवार येणे झेपणार नसल्याने त्याची पत्नी तीन मुलींसह मिरजेत आली. दोन महिन्यांपासून बोलवाड येथे आंबेडकरनगरमध्ये पारधी वस्तीत पाल मारून रहात आहे. भीक मागून तसेच प्राण्यांची शिकार करून चरितार्थ चालवत होती. मोठी मुलगी उमाश्री मतिमंद आहे. आज सकाळी ती अंगणात खेळत होती. रानडुक्कर किंवा अन्य रानटी प्राण्यांच्या शिकारीसाठीचे लसुणगड्डे घरात ठेवले होते. त्यातील एक गड्डा खेळता-खेळता तोंडात धरून तिने चावला. त्याचक्षणी जोरदार स्फोट झाला. संपूर्ण चेहरा फाटला. मेंदूपर्यंत गंभीर दुखापत झाली. काही वेळातच तडफडून तिचा मृत्यू झाला.
उमाश्रीच्या मृत्यूने मातेने आक्रोश सुरू केला. इतर पारधी शेजाऱ्यांनी तिची समजूत काढली. उमाश्रीच्या दफनाची तयारी सुरू केली. तोपर्यंत ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाली. त्यांनी बोलवाड गाठले; उमाश्रीच्या शवविच्छेदनासाठी आईची समजूत काढली. दुपारी मिरजेत शवविच्छेदन झाल्यानंतर संध्याकाळी बोलवाडमध्ये दफनविधी झाला.
