वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे पवई येथील 22KV विद्युत उपकेंद्रात बिघाड झाल्याने कुर्ला (दक्षिण) वाहिनीतून एल विभाग व एस विभागात होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाली आहे. दुरुस्तीची कामे पूर्ण होईपर्यंत पाणीपुरवठा राहणार बंद आहे. त्यामुळे पाणी जपून आणि काटकसरीने वापरण्याचं आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आलंय. वादळवारा आणि अवकाळी पावसामुळे सोमवार सायंकाळी ५ वाजता पवई येथील २२ केव्ही विद्युत उपकेंद्राचे नुकसान झालं आहे. पवई उदंचन केंद्राला होणारा विद्युत पुरवठादेखील खंडित झाला आहे.
वादळवारा आणि अवकाळी पावसामुळे महानगरपालिकेच्या एल आणि एस विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. विद्युत उपकेंद्राची दुरूस्ती व पवई उदंचन केंद्रातील विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यावर या दोन्ही विभागात पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.
मुंबईमध्ये सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे पवई येथील २२ केव्ही उदंचन केंद्राला होणारा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. या बेमोसमी पावसामुळे पवई परिसरातील विद्युत उपकेंद्रातील अनेक उपकरणांमध्ये बिघाड झाला आहे. अनेक ठिकाणच्या वीजवाहिन्याही तुटल्या असून, अनेक महत्त्वाच्या उपकरणांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच अंधारात दुरुस्तीच्या कामांमध्ये विलंब होण्याची शक्यता आहे. यामुळे एस विभागातील मोरारजी नगर, जय भीम नगर, पासपोली गावठाण, लोकविहार सोसायटी, रेनेसेन्स हॉटेल परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. तर महात्मा फुले नगरच्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
महानगरपालिका प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. तसेच दुरुस्तीची कामे पूर्ण होईपर्यंत वरील परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सदर दुरुस्ती झाल्यावर पवई उच्च स्तरीय जलाशय क्रंमांक कप्पा क्रमांक २ भरून पाणीपुरवठा हळूहळू सुरळीत करण्यात येईल. अचानक उद्भवलेल्या या अडचणींमुळे पाणीपुरवठा होऊ न शकल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे, त्याबद्दल महानगरपालिका प्रशासन दिलगीर आहे. मुंबईकर नागरिकांना नम्र विनंती आहे की, कृपया सदर कालावधीमध्ये महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
