चेंबूर येथे जुन्या वादातून ४८ वर्षीय व्यक्तीचा खून करण्यात आला. याप्रकरणी चेंबूर येथील आरसीएफ पोलिसांनी रविवारी पहाटे दोघांना अटक केली आहे. याप्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्ती बजरंग दलाचा कार्यकर्ता होती. दोन दिवसांपूर्वी आरोपींशी झालेल्या भांडणातून हा खून झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
पितांबर हिरामण जाधव (४८) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते चेंबूर नाका परिसरातील रहिवासी होते. जाधव यांचा भाचा नितीन काळे याच्या तक्रारीवरून आरसीएफ पोलिसांनी याप्रकरणी हत्या, धमकावणे, कट रचणे, घरात बेकायदा शिरणे अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कार्तिक अण्णा देवेदर ऊर्फ बाबू (२८) व अण्णा दुबाई देविंदर ऊर्फ दिल्ली (५४) यांना अटक केली आहे. यातील बाबू हा सराईत आरोपी असून त्याच्याविरोधात सात गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्यावर तीन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्याला सहा महिन्यांसाठी मुंबईतून हद्दपारही करण्यात आले होते. याप्रकरणी दोन महिलांसह आणखी आरोपींचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
