राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने उष्माघाताचे प्रकार वाढू लागले आहेत. यंदा उन्हाळ्यात आतापर्यंत उष्माघाताच्या २०२ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सर्वाधिक २३ रुग्णांची नोंद नाशिक जिल्ह्यात झाली असून, पुण्यातही सात रुग्ण आढळून आले आहेत. आगामी काळात रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याचा अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला आहे.
राज्यात १ मार्च ते ५ मे या कालावधीत उष्माघाताच्या २०२ रुग्णांची नोंद झाली. राज्यात सर्वाधिक २३ रुग्ण नाशिक जिल्ह्यातील आहेत. त्या खालोखाल बुलडाणा २१, जालना व धुळे प्रत्येकी २०, सोलापूर १८ आणि सिंधुदुर्ग १० अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात यंदा उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद नाही. राज्यात गेल्या वर्षी १ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत उष्माघाताने २२ जणांचा मृत्यू झाला होता. त्यातील सर्वाधिक १३ मृत्यू औरंगाबाद जिल्ह्यातील होते, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
