दरडोई उत्पन्नवाढ तरीही प्रगतीचा वेग कमीच

सिंचन अनुशेषातल्या हिंगोली जिल्ह्याच्या विकासात २०११ ते २०२२ या दशकभराच्या कालावधीत दरडोई उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली. मागास असलेल्या या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न एक लाख १३ हजारांहून दोन लाख ४९ हजारांपर्यंत गेले. रस्ते सुधारले, त्यामुळे हिंगोलीपर्यंत जाण्याचा मार्ग सुकर झाला. समृद्धीमुळे वेळही वाचला. मात्र, तरीही जिल्ह्याच्या एकंदर प्रगतीचा वेग अद्याप संथच आहे.

हिंगोलीची बहुतांश लोकसंख्या शेती व्यवसायाशी जोडली गेलेली. कापूस, सोयाबीन, हळद, केळी ही पिके घेता येऊ शकतात, अशी स्थिती आहे. हळदीवर प्रक्रिया करणारे उद्याोग सुरू करण्यासाठी तरतूदही केली आहे. गुरांच्या देशी आणि संकरित जातीत वाढ करून पशुधन वाढविण्यावरही भर देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पण अनुशेष दूर करण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. लागणारी वीजही पुरेशा प्रमाणात मिळत नाही. वीज वापराचे प्रमाण वाढले आहे खरे, पण उद्योगांमध्ये वीजवापर काही वाढलेला नाही. मत्स्यपालन, रेशीम शेती, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन आदी व्यवसायांतून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आराखडे आखण्यात आले आहेत. मात्र, मनुष्यबळाची कमतरता, काही विभागांची सरकारी कार्यालये अजूनही परभणी जिल्ह्याशी जोडलेली असल्यामुळे अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. औंढा नागनाथ, नरसी नामदेव या तीर्थक्षेत्र विकासाला चालना दिली तर धार्मिक पर्यटन वाढू शकते. कागदावर असलेल्या योजना पूर्णत्वास नेताना करोनाकाळात आरोग्याच्या सुविधांमध्ये हिंगोली जिल्ह्यात चांगली वाढ झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *