दानवे यांनी मतदार आणि कार्यकर्त्यांवर विश्वास व्यक्त करून विजयाचा षटकार मारण्याच्या संदर्भात आत्मविश्वास व्यक्त केला आहे. मतदारसंघातील विकास कामे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासविषयक दृष्टिकोनावर आपला प्रचार असेल, याकडे त्यांनी मतदारांचे लक्ष वेधले आहे. दानवे यांनी म्हटले आहे की, दाेनदा विधानसभेवर आणि त्यानंतर सलग पाच वेळेस आपण लोकसभेवर निवडून आलेलो आहोत. एखादी निवडणूक जेव्हा आपण जिंकतो त्यावेळीच पुढील निवडणुकीची तयारी सुरू करतो. जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जनतेला आपल्या विकासविषयक कामांची माहिती आहे. आपण कुणाही उमेदवारावर वैयक्तिक टीका करणार नाही. जर कुणी आपल्यावर टीका आणि आरोप कले तर त्याचा प्रतिवाद करण्यास तसेच उत्तर देण्यास आपले कार्यकर्ते सक्षम आहेत. दोन जिल्ह्यांतील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघातील जनतेला आपले बोलणे, वागणे आणि विकासाचा दृष्टिकोन माहीत आहे.

२००९ मध्ये कल्याण काळे यांनी दिलेल्या अटीतटीच्या लढतीचा संदर्भ निघताच दानवे म्हणतात, २००९ आणि २०२४ च्या निवडणुकीत पंधरा वर्षांचा कालावधी लोटला आहे. या कालावधीत देश बदलला, नवीन कार्यकर्ते आले आणि देशात नवीन विकासाभिमुख नेतृत्त्व आले आहे. २००९ आणि २०२४ च्या निवडणुकांमध्ये जालना मतदारसंघाची तुलना करता येणार नाही. आपली लढाई व्यक्तीशी नसून विचारांशी आहे आणि पंतप्रधान मोदी यांचे विचार हेच आपले विचार आहेत. गरीब, शेतकरी, युवा, महिला यासह सर्वांना न्याय देण्याचे काम मोदींनी केलेले आहे. कार्यकर्त्यांचा आणि आपला एकमेकांवर, मोदींच्या विचारावर व जनतेवर आमचा विश्वास आहे. कार्यकर्त्यांचे आमचे नेटवर्क मजबूत आहे.

काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे महाविकास आघाडीतील इतर दोन घटक पक्षांच्या मदतीने दानवे यांच्याशी दोन हात करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. काळे म्हणतात मतदारसंघात फिरताना भाजप उमेदवाराच्या संदर्भात अनेक हकिकती कानावर आलेल्या आहेत. शेतीमालाला योग्य भाव नसल्याने आणि बेरोजगारीमुळे जनतेत नाराजी आहे. विविध समाजांच्या आरक्षणाच्या मागण्या असताना भाजपच्या अधिपत्याखालील सरकारने त्यांना फक्त झुलवत ठेवण्याचेच काम केले आहे. मतदारसंघाचा विकास किती झाला आणि इतरांचा वैयक्तिक विकास किती झाला हाही प्रश्न आहे.

मतदारसंघात महाविकास आघाडीच्या तिन्हीही घटक पक्षांच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. २००९ मध्ये भाजपसोबत शिवसेना होती. आता उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा असणारे शिवसेनेचे कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत. त्याचप्रमाणे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बळही पाठीशी आहे. त्यामुळे काँग्रेसचा मोठा मतदार असलेल्या या लोकसभा मतदारसंघात आमचे एकत्रित बळ २००९ पेक्षाही अधिक आहे.