नवी मुंबईत फ्लेमिंगो अधिवासाचा गळा घोटला जातोय का? सरकारी यंत्रणाच ऱ्हासास कारणीभूत?

देशातील सुनियोजित शहर अशी ओळख मिरविणारे नवी मुंबई गेल्या काही वर्षांत फ्लेमिंगो पक्ष्यांच्या अधिवासाचे शहर म्हणूनही नावारूपास आले आहे. असे असले तरी गेल्या वर्षभरात या दुर्मीळ आणि सुंदर पक्ष्याच्या अधिवासावर पद्धतशीरपणे अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशातील मोठ्या उद्योगपतींसाठी या जागा खुल्या करण्याचे सरकारी प्रयत्न वादात सापडले असताना पक्ष्यांचा अधिवास असलेल्या पाणथळींच्या जागा कोरड्या करणे, संवेदनशील क्षेत्रात रस्त्याचे बांधकाम तसेच सौरदिव्यांची उभारणी करणे यासारखे वादग्रस्त उद्योग महापालिकेनेच सुरू केले आहेत. मध्यंतरी बेलापूर भागात एका दिशादर्शक फलकाला आपटून चार फ्लेमिंगो पक्ष्यांना जीव गमवावा लागला होता. नवी मुंबईचे ब्रॅंडिंग एकीकडे ‘फ्लेमिंगो सिटी’ असे करायचे आणि दुसरीकडे या पक्ष्यांच्या अधिवासाचे मार्ग बंद करायचे असे संतापजनक प्रकार या शहरात सरकारी यंत्रणांच्या आशिर्वादानेच सुरू आहेत.

नवी मुंबई दुर्मीळ पक्ष्यांचा अधिवास का ठरतो?

नवी मुंबईत असलेल्या पाणथळ जागांवर अनेक वर्षांपासून परदेशी पक्षी येण्याचे प्रमाण मोठे आहे. या शहरातील उरण तालुका हा नैसर्गिक संपत्तीने युक्त आहे. या निसर्गात येथील वन्यजीव अधिकच भर टाकत असतात. उरण तालुक्यातील खाडी क्षेत्रातील पाणवठ्यांवर सुरुवातीला हजारो फ्लेमिंगोसह विविध पक्ष्यांच्या शेकडो प्रजाती पहायला मिळत. आहारस्रोत आणि पोषक वातावरण येथे असल्याने दुर्मीळ पक्ष्यांसाठी हा तालुका आवडीचे ठिकाण ठरत असे. मात्र याच भागात सुरू असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बांधकाम तसेच इतर विकास प्रकल्पांमुळे शेकडो एकरावरील पाणथळीचे क्षेत्र यापूर्वीच नष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे एके काळी फ्लेमिंगोंनी बहरलेला हा परिसर आता उजाड होतो की काय असे चित्र आहे. उरण तालुक्यातील हे पक्षी आता नवी मुंबई महापालिका हद्दीत असलेल्या नेरुळ, सीवूड, बेलापूर भागातील पाणथळींवर निवाऱ्यासाठी येऊ लागले आहेत. गेल्या काही वर्षात हे प्रमाण इतके वाढले आहे की ही या शहराची ओळखच या पक्ष्यांच्या नावाने होऊ लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *