पुण्यात पुन्हा गुन्हेगारीच्या घटनामंध्ये वाढ होताना दिसत आहे. पुण्यात कॉलेजच्या तरुणांपासून शाळकरी मुलांपर्यंत गुन्हेगारी पसरताना दिसत आहेत. पुण्यामध्ये शिकत असलेल्या तरुणीचा तिच्याच मित्रांनी नऊ लाखांच्या खंडणीसाठी खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी रविवारी रात्री उशीरा तरुणीचा मृतदेह नगर तालुक्यातील सुपा परिसरातून ताब्यात घेतला.
भाग्यश्री सूर्यकांत सुडे असं खून करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. भाग्यश्री मूळची लातूर जिल्ह्यातील होती. पुण्यातील वाघोली परिसरातील कॉलेजमध्ये इंजीनियरिंगचे शिक्षण घेत होती. भाग्यश्रीचा मित्र शिवम फुलावळे यानं त्याचे साथीदार सागर जाधव आणि सुरेश इंदुरे यांच्या मदतीने तिचं अपहरण करून खून केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल आहे. तिघांनाही विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे.
30 मार्च रोजी भाग्यश्रीचा तिच्या आईसोबत बोलणं झालं होतं. मात्र 31 मार्च पासून भाग्यश्रीचा मोबाईल बंद होता. त्यानंतर दोन एप्रिलला भाग्यश्रीच्या आईच्या मोबाईलवर तुमच्या मुलीचं अपहरण करण्यात आलं असून तिच्या सुटकेसाठी नऊ लाख रुपये तातडीने द्या असा मेसेज आला होता. भाग्यश्रीच्या वडिलांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर भाग्यश्रीचा खून करण्यात आल्याची बाब उघडकीस आली. आरोपींनी तिचा मृतदेह नगर जिल्ह्यातील सुपा गावाजवळ एका शेतात पुरून ठेवला होता.
